बंद

जिल्ह्याविषयी

महाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून जनगणना 2011 नुसार लोकसंख्येच्या दृष्टिने त्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून ते राज्याच्या 1.37 टक्के आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र , उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिणेला जगप्रसिध्द व भारताची आर्थिक राजधानी समजले जाणारे मुंबई शहर अशा जिल्हयाच्या चतु:सिमा आहेत. जिल्हयातील ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी या तालुक्यांचे क्षेत्र औद्योगिक दृष्टया विकसीत असून मुंबई शहराच्या आधुनिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 720 कि.मी. किना-यापैकी 27 कि.मी. लांबीचा समुद्र किनारा जिल्हयाला लाभला आहे. भूजल मासेमारीसाठी 7642 हेक्टर क्षेत्र अनुकूल आहे. सागरी मासेमारी बरोबरच भूजल मासेमारी केली जाते. मत्स्य विक्रीसाठी मुंबई सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून आखाती देशांतूनही मत्स्य उत्पादनाला चांगली मागणी आहे.
औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ठाणे जिल्हयाचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक असून जिल्हयाच्या निम्म्यापेक्षा जास्त भागाचा आर्थिक व सामाजिक विकास हा औद्योगिकरणामुळे झाला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित 8 औद्योगिक वसाहती विकसीत केल्या आहेत. मुंबई सारखे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व सोयीचे बंदर, दळणवळणाच्या जलद सोयी आणि शासनामार्फत पुरविल्या जाणा-या सुविधा यामुळे जिल्हयामध्ये उद्योगधंदयाची भरभराट झालेली आहे. विशेषत: जिल्हयाच्या दक्षिण व पश्चिम भागामध्ये उद्योंगाचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. जिल्हयामध्ये नोंदणी झालेल्या उद्योगात प्रामुख्याने रसायने व औषधे यांचे मोठया प्रमाणावर उत्पादन केले जाते. याशिवाय प्लॅस्टिकच्या वस्तू,लोखंडी साहित्य आणि पॉवरलूम कापड यांची निर्मिती करणारे मध्यम व छोटे उदयोग मोठया प्रमाणात चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी नंतर भिवंडी येथील यंत्रमागावर कापड विणण्याचा व्यवसाय प्रसिध्द आहे. केंद्रशासन अंगिकृत दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना अंबरनाथ येथे आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे कुशल व अकुशल कामगारांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हयामध्ये खनिज उत्पादन फारसे नसले तरी बांधकामासाठी रेती काढण्याचा व्यवसाय मुंब्रा, ठाणे, घोडबंदर या परिसरात मोठया प्रमाणावर चालतो.