बंद

जिल्ह्याची रूपरेखा

भौगोलिक रचना

भौगोलिक स्थान

ठाणे जिल्हा कोकणचा उत्तर भाग असून तो पूर्वेकडे असणा-या सहयाद्रीच्या रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्‌टीच्या दरम्यान पसरला आहे. जिल्ह्याला 113 किमी चा समुद्र किनारा आहे. जिल्हयाचे भौगोलिक स्थान 72.45 आणि 73.48 पूर्व रेखांश व 18.42 आणि 20.20 उत्तर अक्षांश मध्ये येते. दक्षिण पूर्वेकडील पसरलेला जिल्ह्याचा पूर्व-पश्चिम भाग हा 100 किमी असून उत्तर-दक्षिण 140 किमी आहे. जिल्हा मुख्यालय ठाणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 25 किमी अंतरावर आहे आणि मुंबई शहरापासून 35 किमी अंतरावर आहे.

भौगोलिक क्षेत्र

2011 च्या जनगणनेनुसार विभाजीत जिल्हयाचे क्षेत्रफळ 4214 चौ.कि.मी. असून राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 1.37 टक्के आहे. क्षेत्रफळाचा विचार केला तर राज्यात जिल्हयाचा 33 वा क्रमांक लागतो. जिल्हयातील 7 तालुक्यापैकी शहापूर तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असून ते 1629 चौ.कि.मी. (38.66 टक्के) तर सर्वात लहान उल्हासनगर तालुका 13 चौ.कि.मी. (0.31 टक्के) क्षेत्रफळाचा आहे. जिल्हयातील ठाणे व उल्हासनगर हे दोन तालुके पूर्णपणे शहरी आहेत. या दोन तालुक्यासह कल्याण, भिवंडी व अंबरनाथ हे तालुके तुलनात्मकदृष्टया विकसित आहेत.

जिल्हयाच्या सीमा

जिल्हयाच्या पूर्वेला पुणे व अहमदनगर जिल्हे आहेत. उत्तर पूर्वेला नाशिक जिल्हा तर उत्तरेला पालघर जिल्हा आहे. या जिल्हयाच्या पश्चिमेला अरबी समुद्र पसरलेला असून बृहन्मुंबई व रायगड जिल्हे दक्षिणेला आहेत.

भौगोलिक रचना

जिल्ह्याला त्याच्या भौगोलिक रचनेच्या आधारे तीन भागांत विभागले आहे.

  • मध्य भागमध्ये सह्याद्रीची रांग आणि त्याच्या उतारावर प्रामुख्याने वनक्षेत्र आहे
  • मध्य क्षेत्र मुख्यतः तांदुळाच्या शेताने आच्छादित आहे आणि
  • पश्चिम किनारपट्टीसह पश्चिमेकडील भाग, जेथे फलोत्पादन, उच्च दर्जाचे चारा आणि भाजीपाला लागवड शेतीविषयक पद्धती आहेत

पर्वत रांगा

पूर्वेकडे असणा-या सहयाद्रीच्या रांगा सह्याद्रीच्या सीमारेषेवर सीमारेषा उभ्या आहेत. तसेच छोट्या छोट्या पर्वत रांगा विखुरलेला भूभाग आहे. पूर्वेकडे पर्वत रांगा ऊंच-ऊंच असून पश्चिमकडे हळूहळू कमी-कमी होतात. जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातसुध्दा छोट्या पर्वतरांगा पसरले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील येऊर किंवा मामा भांजा हिल्स हे थंड हवेचे ठिकाण आहे.

नद्या

ठाणे जिल्हयात वैतरणा आणि उल्हास या दोन महत्वाच्या नदया वाहतात. वैतरणा नदीचा उगम उत्तर पूर्वेलगतच्या नाशिक जिल्हयातील त्र्यंबक पायथ्यापासून होऊन ती दक्षिणेकडे वाहत जाऊन ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात प्रवेश करुन पुढे वाडा, पालघर या तालुक्यातून वाहत जाऊन पालघर तालुक्याच्या दक्षिणेला नवघर येथे वैतरणा खाडीत अरबी समुद्राला मिळते. शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यातून तानसा नदीचा उगम होतो व पुढे वसई तालुक्यातील चिमण येथे वैतरणा नदीशी तिचा संगम होतो. वैतरणा नदीच्या उजव्या बाजूने पिंजाळ, दहेरजा व सूर्या या उपनदया मिळतात आणि डाव्या बाजुने तानसा नदी मिळते. उल्हास नदीचा उगम भोर घाटमाथ्यातून होऊन उत्तर पूर्वेकडून ती रायगड जिल्हयातील कर्जत तालुक्यात प्रवेश करते व पुढे वसई खाडीला मिळते. उल्हास नदीच्या तीन उपनदया असून बारवी नदीचा उगम मुरबाड तालुक्यातील घाटमाथ्यातून होतो. पुढे ती अबंरनाथ तालुक्यातील आपटी गावानजीक उल्हास नदीस मिळते. भातसा नदीचा उगम शहापूर तालुक्यातील घाटमाथ्यातून होऊन ती कल्याण तालुक्यातील वडवली गावाजवळ येऊन उल्हास नदीला मिळते. भातसा नदीची काळू नदी ही मुख्य उपनदी असून ती शहापूर तालुक्याच्या घाटमाथ्यातून वाहात कल्याण तालुक्यामधील सांगोडे गावाजवळ भातसा नदीला मिळते. बारवी व भातसा या उपनदया उल्हास नदीला तिच्या उजव्या बाजूने येऊन मिळतात.वैतरणा खाडीच्या किनारपट्‌टीच्या आतील 25 कि.मी. अंतराचा भाग व उल्हास नदीचा कल्याणपासून 40 कि.मी.अंतराचा भाग जल वाहतुकीस योग्य आहे.

भुपृष्ठ रचना

जमिनीच्या प्रकारानुसार भुपृष्ठाची प्रामुख्याने दोन भागात विभागणी झालेली दिसून येते.

  • काळी व वाळू मिश्रित जमीन ही ठाणे तालुक्यात आढळून येते. ही जमीन सुपीक असून ती मुख्यत: भाताचे पीक, भाजीपाला व फळबागा यांच्या लागवडीस योग्य आहे.
  • तपकिरी लालसर जमीन ही बहुतेक किनारपट्‌टीच्या व सहयाद्री घाटमाथ्याच्या उतरणीच्या द-या खो-यातील पटट्‌यात आढळून येते. मुख्यत: भिवंडी, कल्याण व शहापूर तालुक्यात अशी जमीन असून ती भात लागवडीस उपयुक्त आहे.

हवामान

जिल्हयाचे हवामान सर्वसाधारणपणे सम आहे. तथापि ते सागर किनारी व किनारपट्टीच्या नजीक उष्ण व दमट आहे. किनारपटटीतील ठाणे, तालुक्यात हवामान उष्ण आहे. याउलट पूर्वेकडील सहयाद्री पर्वताच्या उतरणीला पायथ्याच्या सपाटी प्रदेशातील हवामान कमी उष्ण आहे. सर्वसाधारणपणे जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात हवा थंड असते.

पर्जन्यमान

राज्याची तीन ॲग्रीकजायकटिक विभागात विभागणी झालेली असून त्यातील कोकणपट्टीतील अतिपर्जन्य प्रदेशामध्ये ठाणे जिल्हयाचा समावेश आहे. जिल्हयात नैऋत्य मान्सून या वा-यापासून मुख्यत: पाऊस पडतो. सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर हे पावसाळी महिने आहेत. 2015 मध्ये जिल्हयात सरासरी पाऊस 1884 मि.मि. पडला असून सर्वात जास्त पाऊस शहापुर तालुक्यात 2032 मि.मी. तर सर्वात कमी पाऊस भिवंडी तालुक्यात 1707 मि.मी. पाऊस पडला.